१.(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ……….. या शहराचेउत्खनन करताना सापडले.
(अ) दिल्ली (ब) हडप्पा
(क) उर (ड) कोलकाता
उत्तर :- उर
(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ………. येथे आहे.
(अ) नवी दिल्ली (ब) कोलकाता
(क) मुंबई (ड) चेन्नई
उत्तर :- नवी दिल्ली
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) कुटियट्टम – केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(२) रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
(३) रामलीला – उत्तर भारतातील सादरीकरण
(४) कालबेलिया – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
उत्तर :- रम्मन – पश्चिम बंगालमधील नृत्य
२. टीपा लिहा.
(१) उपयोजित इतिहास
उत्तरः– १) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘उपयोजन‘ होय.
२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच ‘इतिहासाचे उपयोजन‘ असे म्हणतात.
३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.
(२) अभिलेखागार
उत्तर:- १) ज्या ठिकाणी महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, इत्यादी जतन करून ठेवली जातात. त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात.
२) अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. कालगणना करता येते. तसंच तत्कालीन भाषा व लिपी यांचा शोध घेता येतो.
३) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे असून हे आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे.
४) भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे.


४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
उत्तरः- १) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
२) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.
३) कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
(२) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.
उत्तरः- १) पूर्वजांनी निर्माण केलेल्या सांस्कृतिक वारशाचे पुढील पिढयांच्या हितासाठी जतन होणे आवश्यक असते.
२) जो नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे, त्याचे जतन व संवर्धन होणेही गरजेचे असते.
३) काळाच्या ओघात हा नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी ‘युनेस्को’ या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र
उत्तर:- प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय –
(अ) विज्ञान:- मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम आणि सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.
(ब) कला:- कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
(क) व्यवस्थापनः– उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.
(२) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?
उत्तर:- १) भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष हे पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती व परंपरा यांचे अवशेष असल्याने तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. किंबहुना ती आपली ओळख असते.
२) इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असल्याने पुढील पिढ्यांकरता या वारशाचे जतन व संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते.
३) उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी देखील निर्माण होतात.
४) अशाप्रकारे उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.
(३) इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान १० उपाय सुचवा.
उत्तर:- १) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.
२) वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत.
३) ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.
४) ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
५) इतिहासाच्या साधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित नसावा.
(४) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात ?
उत्तर:- नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात.
१) प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.
२) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्यांचा आढावा घेता येतो.
३) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.
४) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.